Join us

वृक्ष तोडण्यास सेनेचा विरोध; वृक्षांचे पुनर्रोपण अयशस्वी, महापौरांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:51 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीत कापण्यात आलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण अयशस्वी ठरल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेल्या पाहणीत उजेडात आले आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीत कापण्यात आलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण अयशस्वी ठरल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेल्या पाहणीत उजेडात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्यास त्यांनी विरोध केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यापेक्षा आरेतून मेट्रो कारशेडच हलवा, अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे. परिणामी, सेना-भाजपात मेट्रोचा वाद पुन्हा उफाळणार आहे.गोरेगाव पूर्व येथे आरे कॉलनीत मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडचे काम सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत. त्यामुळे भाजपाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. या प्रकल्पात बाधित झाडे तोडण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी आला होता. तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण योग्य पद्धतीने होते आहे का, याची पाहणी महापौर, गटनेते व वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी नुकतीच केली.महापौरांनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगतच्या सारीफतनगर येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या ठिकाणच्या वृक्षांची गेल्या सहा महिन्यांपूर्वीची स्थिती व आताच्या वृक्षांबाबतची स्थिती याची गुगल इमेजवरून माहिती घेऊन ती सादर करण्याची सूचना महापौरांनी या वेळी मेट्रो ३ला केली. त्याचप्रमाणे तोडण्यात येत असलेल्या वृक्षांची संख्या, पुनर्रोपित करण्यात येत असलेल्या वृक्षांची संख्या व कोणत्या प्रजातीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड होणार आहे याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना करण्यात आली.आरेतील मेट्रोकारशेड हलवामुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो रेल्वे हवीच आहे. मेट्रोला आमचा विरोध नाही. मात्र मेट्रो कारशेडमुळे जर हजारो झाडांचा बळी जात असेल तर असला पर्यावरणाचा नाश करणारा विकास नको, असे मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.मेट्रो ३च्या कामासाठी एकूण १,२८७ हेक्टर जागा लागणार आहे. ३३ हेक्टरवर मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे.२,६६५ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. वनविभागासोबत झालेल्या करारान्वये पुनर्रोपित केलेल्या वृक्षांचे सात वर्षांपर्यंत संवर्धन करण्याची जबाबदारी ही वनविभागाला देण्यात आली आहे.शितलामाता परिसरातील पुनर्रोपित करण्यात आलेल्या वृक्षांच्या पाहणीत हे वृक्ष मोठ्या प्रमाणात मृत पावल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मेट्रो ३चे याकडे होणारे दुर्लक्ष व पुनर्रोपित करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध का केले नाही? याचा जाब विचारला.

टॅग्स :मुंबई