आरेतील बांधकामाला विरोध कायम
By admin | Published: March 20, 2015 01:59 AM2015-03-20T01:59:08+5:302015-03-20T01:59:08+5:30
आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसह कोणतेच बांधकाम उभे करू नये म्हणून आरे कॉलनी बचाव अभियानाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आंदोलन आता आणखी व्यापक करण्यात आले आहे.
मुंबई : आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसह कोणतेच बांधकाम उभे करू नये म्हणून आरे कॉलनी बचाव अभियानाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आंदोलन आता आणखी व्यापक करण्यात आले आहे. आरे कॉलनीमधील वनसंपदा आणि जैवविविधता टिकून राहावी यासाठी पर्यावरणसंबंधी कायद्याखाली या भागाला संरक्षित क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३साठी आरे कॉलनीमध्ये कारशेड बांधण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तब्बल २ हजार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. परिणामी, पर्यावरणाची हानी होणार असून, येथील आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. बीपीटी अथवा कुलाबा रेक्लेमेशन येथे मेट्रो कारशेड उभारण्यात यावी, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याविरोधातील आंदोलन आता आणखी व्यापक झाले असून, जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २० मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंत मानवी साखळी उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)