Join us

बेकायदा पार्किंगवरील कारवाईला विरोध; वरळीमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:39 AM

मुंबई : बेकायदा पार्किंगविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला तीव्र विरोध होऊ लागला आहे. दंडाची रक्कम थेट १० हजार रुपयांपर्यंत ...

मुंबई : बेकायदा पार्किंगविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला तीव्र विरोध होऊ लागला आहे. दंडाची रक्कम थेट १० हजार रुपयांपर्यंत करण्यात आल्यामुळे या कारवाईचा निषेध होत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षांनीसुद्धा ही कारवाई बेकायदा ठरविली आहे. तर मंगळवारी वरळी विभागात या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

मुंबईतील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिकेने पीपीएल तत्त्वावर २८ ठिकाणी उपलब्ध पार्किंगच्या पाचशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन जाहीर केला आहे. त्या परिसरात अथवा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर उभ्या बेकायदा वाहनांवर रविवारपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. सर्वच पक्षीय नगरसेवकांनी या कारवाईला अंमलबजावणीपूर्वी विरोध दर्शविला होता. गटनेत्यांनी याबाबत निर्णय घेण्याआधीच कारवाईला सुरुवात करण्यात आली. मात्र या कारवाईविरोधात वरळी येथे स्थानिक लोकांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था नसताना ही कारवाई होत असल्याचा आरोप या आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला़या कारवाईच्या पहिल्याच दिवशी ५६ वाहनांवर कारवाई करून १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर सोमवारी दिवसभरात ३५ चार चाकी, ३ तीन चाकी व ४२ दुचाकी यानुसार एकूण ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एक लाख ७० हजार ३४० रूपये दंड स्वरूपात जमा झाला.