Join us

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत; कोल्हापूर प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:49 PM

कोल्हापूर प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाही. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेली काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणाव निर्माण झाला आहे. 

कोल्हापूर प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीही काही शहरात दंगली घडवून आणण्याचे प्रकार झाले आहेत. यातून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. यामागे नेमके कोण आहेत याचा तपास करण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आहे. येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून राज्यातील समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? अशी शंका अजित पवार यांनी उपस्थित केली. 

एखाद्या घटनेचा तपास योग्यप्रकारे करता येऊ शकतो. मात्र यासाठी राज्यकर्त्यांची भूमिकाही तशी असावी लागते, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणेकडे अशी परिस्थिती हाताळण्याची संपूर्ण माहिती असते. फक्त मागे राजकीय इच्छाशक्ती हवी आणि अशा घटना घडू देऊ नयेत, असा सरकारचा अधिकाऱ्यांना आदेश असावा, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

टॅग्स :कोल्हापूरअजित पवारमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे