Join us

'सत्ताधारी पक्षाचे आमदार पिस्तुल दाखवताय, हे गंभीर'; अजित पवारांचा सदा सरवणकरांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:46 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. यानंतर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. 

आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलाचा गैरवापर करून धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला असता. सत्तेचा माज किती झालाय हे या घटनांवरून दिसून येतेय असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी केला. सदर प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील निशाणा साधला. सत्ताधारी पक्षाचे आमदार पिस्तुल दाखवतात हे गंभीर आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी झाली पाहिजे. तसेच हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. 

तत्पूर्वी, सुनिल शिंदे यांच्या आरोपानंतर सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं. माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असंही सदा सरवणकरांनी सांगितलं.

मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी बदनामीला कामातून उत्तर देऊ. मी कामं करून आमदार झालो आहे, असं सदा सरवणकर म्हणाले. गणपती विजर्सनादिवशी जे झालं ते  तेथेच संपलं होतं मग पुढे विषय वाढवायला नको होता. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. सोशल मीडियाला सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं. घरी जाऊन मारहाण करणं योग्य नाही, असंही सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

...तर खरी शिवसेना दाखवून देऊ- खासदार अरविंद सावंत

सदर प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. तसेच योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला. तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असा सवाल अरविंद सावतं यांनी उपस्थित केला. शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जातेय, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.

टॅग्स :सदा सरवणकरअजित पवारशिवसेना