मुंबई: 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर आणावा. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने राज्यातील वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे कदापि सहन केले जाणार नाही, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गेल्या अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहिर केला. घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रीया पूर्ण केली. मी सातत्याने या स्मारकासाठी बैठका घेत होतो, कामाचा आढावा घेत होतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ योजना आम्ही सुरु केली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाबद्दल मी वादग्रस्त विधान केलेले नाही. मात्र राज्यपालांसह भाजपचे पदाधिकारी सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. मात्र त्याबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व बघत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर करुन स्वराज्यरक्षक ही भूमीका मी मांडली. माझे इतिहासाचे वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडली. मी इतिहासाचा संशोधक नाही त्यामुळे त्यासंदर्भात जे तपशीलवार आरोप प्रत्यारोप होताहेत त्याबाबत युक्तिवाद करणार नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा, अभ्यासकांचा आहे.
नव्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याबाबत तपशीलवार विवेचन केले आहे. इतरही अनेकांनी भूमिका मांडल्या आहेत. यापुढेही इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करत राहावे. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्तच ठरेल. मात्र राज्यपालांसह भाजपच्या वाचाळविरांना वाचविण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन भाजपने राज्यभर आंदोलन करण्याचे षडयंत्र रचले. राजकीय हेतूने वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे हे जनता कधीही सहन करणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.