Join us  

काँग्रेसचे रवी राजा पालिकेचे विरोधी पक्षनेते

By admin | Published: April 12, 2017 2:15 AM

हक्क सोडला, तरी लेखी देण्यास भाजपा तयार नसल्याने गेल्या महिन्याभरापासून लटकलेला विरोधी पक्षनेते पदाचा पेच अखेर सुटला आहे़ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तयार

मुंबई : हक्क सोडला, तरी लेखी देण्यास भाजपा तयार नसल्याने गेल्या महिन्याभरापासून लटकलेला विरोधी पक्षनेते पदाचा पेच अखेर सुटला आहे़ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तयार नसल्यास, त्यानंतरच्या राजकीय पक्षाकडे हे पद देण्याचे कायदेशीर मत विधीखात्याने दिले़ त्यामुळे काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ महापालिकेच्या महासभेत आज घालण्यात आली़ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद द्यावे लागले आहे़भाजपाने सर्व पदांवरील हक्क सोडण्याचा निर्णय घेतल़ा़ महापौर, उपमहापौर, वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत न उतरण्याचे भाजपाने जाहीर केले़, परंतु सत्तेत सहभागी नसल्याने नियमानुसार भाजपाच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावेदार ठरत होता़, परंतु पारदर्शकतेचे पहारेकरी या भूमिकेतून काम करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने विरोधी पक्षनेते पद नाकारले़ त्यामुळे विरोधी पक्ष कोण? असा पेच निर्माण झाला होता़ यावर पालिकेने विधी खात्याचे मत मागविले़ हे मत अखेर महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आले आहे़ त्यानुसार, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तयार नसल्यास विरोधी पक्ष म्हणून तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद जाईल, असे स्पष्ट झाले़ हे मत येताच महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांनी भाजपाकडे विचारणा केली़ मात्र, विरोधी पक्ष नेतेपद नको, असे गटनेते मनोज कोटक यांनी जाहीर केल्यामुळे अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांना हा बहुमान आज दिला़ (प्रतिनिधी)अस्तित्व टिकले़़़ऐन निवडणुकीच्या काळातच अंतर्गत गटबाजी उफाळून आल्यामुळे काँग्रेसचे मोठ्या संख्येने निवडून येण्याचे स्वप्न भंगले़ गटबाजीचा फटका बसून काँग्रेसची पीछेहाट होऊन महापालिकेत काँग्रेसचे तब्बल २१ संख्याबळ कमी झाले़ ३१ नगरसेवकच निवडून आल्याने काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला़ त्यामुळे अस्तित्व टिकून राहण्यासाठी विरोधी पक्षनेते पद मिळवणे काँग्रेससाठी आवश्यक ठरले़ म्हणून हे पद मिळावे, यासाठी काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी सातत्याने धडपड सुरू होती़भाजपचा पारदर्शकतेवर भरमुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखली जाते़ या महापालिकेत व सभागृहामध्ये पारदर्शक कामे व्हावीत, हीच आमची भूमिका असणार आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने दक्ष राहाणार आहोत. मात्र, असे असले, तरी आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली़