मुंबई : अनुसूचित जाती-जमातींच्या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानामुळे एकच गदारोळ झाला. पंडीत जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसची भूमिका ही आरक्षण विरोधी होती, असा आरोप दरेकरांनी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अनुसूचित जाती- जमातींना लागू असलेल्या आरक्षणाला दहा वर्षे मुदतवाढ देण्याच्या १२६ व्या घटनादुरुस्तीला समर्थन देणारे विधेयक विधान परिषदेतही एकमताने संमत करण्यात आले. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात हे विधेयक मांडले. या विधेयकाला पाठिंबा देताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राजकीय टोलेबाजी केली. अनुसूचित जाती जमातीला आरक्षण मिळूनही त्यांची प्रगती झाली नाही, ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवी असे सांगतानाच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा या आरक्षणाला विरोध होता, असा आरोप त्यांनी केला.दरेकरांच्या विधानाला काँग्रेससह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जोरदार विरोध केला. विरोधी पक्षनेते खोटा इतिहास मांडत आहेत, त्यांनी सभागृहाची माफी मागावी अशाी मागणी पाटील यांनी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज १५मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. विरोधी पक्षनेत्यांचे वक्तव्य तपासून पाहिले जाईल, असे सभापतींनी आश्वस्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्याने या आरक्षणाला २५ जानेवारी २०३० पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेत हिवाळी अधिवेशनात मंजूर केले होते. लोकसभेत अनुसूचित जातीसाठी ८४ आणि अनुसूचित जमातीसाठी ४७ जागा राखीव आहेत. देशातील विधानसभांमध्ये एकूण ६१४ जागा अनुसूचित जातीकरिता आणि ५५४ जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित आहेत.>‘कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम तत्काळ पूर्ण करावे’मुंबई : सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावातील कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिले.आज विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या अपुर्णावस्थेतील स्मारकासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला. त्यावेळी सभापतींनी हे निर्देश दिले. सातारा जिल्ह्यातील मंत्री म्हणून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याकामी लक्ष देऊन स्मारकाचे काम पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मर्ढेकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करून कवीवर्यांचा यथोचित सन्मान करावा. स्मारक पूर्ण झाल्यावर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करावा, असेही निंबाळकर यांनी सांगितले.दरम्यान, सभागृह नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला.
विरोधी पक्षनेते दरेकरांच्या विधानाने गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:16 AM