मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अन् गुलाबराव पाटील थेट गुवाहटीत पोहचले; नेमका प्लॅन काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:46 AM2022-06-23T11:46:39+5:302022-06-23T11:46:45+5:30
स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे.
मुंबई- राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फूट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
गुलाबराव पाटील हे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईलाच थांबून होते. मात्र, शिवसेनेकडून शिंदेचे बंड रोखण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते गुवाहाटीला रवाना झाले. याचदरम्यान गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्वाची माहिती देखील दिली.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याबाबतचा सल्ला दिला. स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपाचा नेमका प्लॅन काय आहे, याबाबत आता चर्चा रंगली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.
मी पद सोडण्यास तयार- उद्धव ठाकरे
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.