मुंबई- भाजपाचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पंचायत ते संसद हे भाजपचे स्वप्न आहे. सत्तेच्या ठिकाणी दुसरे कोणी असता कामा नये, या त्यांच्या धोरणाला रोखले पाहिजे. आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली. इतिहास ठावूक नसलेले आम्हाला काय शिकवणार?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
एकहाती सत्तेवर नंतर बोलू- उद्धव ठाकरे
लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर बाकीचे आपण गांभीर्याने घेत नाही. ही भूमिका आता चालणार नाही. एकहाती सत्तेवर नंतर बोलू. पक्ष वाढवत असताना एकदा जरी जिंकलेली जागा असेल, तरी तिची माहिती माझ्याकडे आली पाहिजे. युती भाजपने तोडली; पण, त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं.