Join us

...तर वेगळा विचार करणार; मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांनी केलं भाष्य, पुन्हा रंगल्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 7:37 PM

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत.

मुंबई: आगामी महापालिकेच्या निवडणूकीत भाजपा आणि मनसे यांची युती होणार की नाही, यासंदर्भात गेल्या काही दिवसांआधी चर्चा सुरु होती. त्यांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वेबिनारमध्ये युतीबाबत केलेल्या वक्त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. 

एका वेबिनारमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे. जी काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करु. पण क्षेत्रीय अस्मितेसोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिताही आम्हाला महत्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घ्यायचं आम्हाला योग्य वाटतं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही, या मताचे आम्ही आहोत. ही मतं आता तरी आमची आणि मनसेची वेगवेगळी आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच ती मतं जुळली तर वेगळा विचार करणार, पण आज तरी ती जुळत नाहीत. ती जुळत नसली तर युतीचा कोणता प्रश्नच निर्माण होत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्याचा निर्धार केला आहे. 

पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचं वक्तव्य

"आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमनसेभाजपामहाराष्ट्र