Join us

Devendra Fadanvis: राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 5:38 PM

राज ठाकरेंच्या या अयोध्ये दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- आगामी ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज केली. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. 

राज ठाकरेंच्या या अयोध्ये दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येचा दौरा कुणीही करू शकतो. प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावं वाटतं असेल, तर त्यात गैर काही नाही. श्री रामाचे भव्य मंदिर तिकडे होत आहे, ते पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

राज ठाकरेंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.

चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या- अमोल मिटकरी 

राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, मात्र श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच हनुमान चालीसाच्या दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमनसेभाजपाअयोध्या