केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार?; देवेंद्र फडणवीस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:18 IST2020-02-07T04:33:27+5:302020-02-07T06:18:02+5:30
फडणवीस यांना भाजपचे नेतृत्व लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार?; देवेंद्र फडणवीस म्हणतात...
मुंबई : मी राष्ट्रीय राजकारणात जाणार या अफवा असून पक्षाने मला त्या बाबत कोणतीही विचारणा केलेली नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.
फडणवीस यांना भाजपचे नेतृत्व लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या चर्चेमुळे भाजपचे राज्यातील आमदार आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले आमदार, नेते यांच्यात अस्वस्थता आहे. या बाबत त्यांनी थेट फडणवीस यांनाच विचारणा केली. त्यावर, ‘मी कुठेही जाणार नाही’ असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, मी दिल्लीत जाणार असल्याच्या बातम्या कुठून येताहेत ते माहिती नाही, या बातम्यांचा सोर्स काय हेही कळत नाही. पक्षाने मला महाराष्ट्रात विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मीडियात एकाने एक बातमी दिली की इतर काही जण तशा बातम्या देतात असा अनुभव काहीवेळा येतो. मी दिल्लीत जाणार असल्याची बातमीदेखील तशीच पसलेली दिसते, असे फडणवीस म्हणाले.
मला आनंदच - खडसे
पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून त्यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली तर मला आनंदच होईल, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.