मुंबई : राज्यातील पोलीस बदलीतील गोपनीय अहवाल फुटल्याप्रकरणी रविवारी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी दोन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला.
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यापूर्वी ६ वेळा चौकशीसाठी नोटीस दिली होती. यादरम्यान त्यांना प्रश्नावली पाठवून उत्तरे देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी उत्तरे न दिल्याने शनिवारी त्यांना पुन्हा नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले. मात्र, होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता, रात्री त्यांच्याच घरी येऊन जबाब नोंदविण्याचे ठरले. त्यानुसार, रविवारी दुपारी बारा वाजता पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि सहायक आयुक्त नितीन जाधव देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यावर पोहोचले.
कार्यकर्ते सकाळपासूनच आक्रमक झाले होते. त्यांच्या घराबाहेर देखील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तब्ब्ल दोन तासानी पथक त्यांच्या बंगल्याबाहेर पडले. त्यांनी दिलेल्या उत्तरांनुसार, सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात गरज पडल्यास त्यांची पुन्हा चौकशी होऊ शकते, अशीही माहिती एका अधिकाऱ्याने दिली.