मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. मुंबईची तुलना POK (पाकव्यप्त काश्मीरशी) करून कंगना राणौतने एक वाद ओढवून घेतला. या वादाचे देशभर पडसाद उमटले. कंगना राणौत विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारवर टीका करणारी कंगना भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र कंगनाने आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही, असा खुलासा केला आहे.
‘लोकमत’शी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही. हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपाच काय, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही – कंगना रणौत
भारतीय जनता पार्टीच काय, मी अन्य कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये. मी बेधडकपणे बोलत असते, त्यामुळे माझ्या अशा स्वभावामुळे मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षामध्ये बांधून राहिल्यासारखं काम करु शकत नाही, असं कंगनाने एका चित्रपटाच्या प्रमोशनावेळी सांगितले होते.
कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला- संजय राऊत
कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी कंगनाबाबत कोणतेच भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सूचकपणे सबुरीचा सल्ला दिला. या साऱ्या घडामोडीनंतर शिवसेनेने या प्रकरणी आता कोणतेच विधान करायचे नाही, अथवा जाहीर भूमिका घ्यायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली असतानाही संजय राऊत यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता.