Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची आज चौकशी; भाजपाकडून राज्यभर आंदोलन सुरु, सरकारविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:44 AM2022-03-13T11:44:00+5:302022-03-13T11:45:09+5:30
देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर काही तासांतच चक्रे फिरली व तुम्ही येऊ नका, आम्हीच तुमच्या सागर बंगल्यावर येतो, असा निरोप फडणवीस यांना आला.
पोलिसांनी नोटीस पाठवून जबाबासाठी बोलविल्याची माहिती स्वत: फडणवीस यांनीच शनिवारी दिली. त्यानंतर सायंकाळी फडणवीस यांनीच सहपोलीस आयुक्तांनी दूरध्वनी करून तुम्ही पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून माहिती घेऊ, अशी माहिती ट्विटरवरून दिली.
देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी भाजपा आंदोलन करुन निषेध व्यक्त करत आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटिसीविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन, राज्य सरकारच्या पुतळ्याची जोडी मारत होळी करणार; राम कदम यांची टीका.#BJP#DevendraFadnavishttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/rxa8oMRGtP
— Lokmat (@lokmat) March 13, 2022
दरम्यान, फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली.
यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून २५ मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
षड् यंत्राचा पर्दाफाश केल्याने नोटीस पाठविली असावी-
मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि पोलीस माझ्याकडील माहितीचा स्रोत विचारू शकत नाहीत. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. योग्य उत्तर देणार आहे. मी सरकारच्या आशीर्वादाने विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध झालेल्या षड्यंत्राचा अलिकडे पर्दाफाश केल्याने ही नोटीस पाठविली असावी. फोन टॅपिंग प्रकरणी मी माहिती फोडली नव्हती, सध्याच्या एका मंत्र्यांनीच ती फोडली होती आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.