Join us

देवेंद्र फडणवीसांचे पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले; सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:49 PM

विरोधक खोटे पुरावे सादर करतंय, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

मुंबई- राज्यात ईडीच्या कारवायांवरून वादंग असतानाच आता ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानं खळबळ माजली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

ईडीच्या या कारवाईवरून राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. केंद्र सरकार दडपशाहीचं राजकारण करत आहे. विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत. विरोधक खोटे पुरावे सादर करतंय, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. 

सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय सुडाच्या हेतूने सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे, पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं, पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवाने गैरवापर सुरू आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनविरोधात मार्च २०१७ मध्ये काळ्या पैशांबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर, पुष्पक बुलियन्सच्या २१.४६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित होती. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्या संगनमताने पुष्पक समूहातील पुष्पक रियल्टीचा निधी हस्तांतरित केला. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावे हा निधी हस्तांतरित केला होता. यातूनच पुढे, चतुर्वेदीच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना २०.०२ कोटींचे हस्तांतरण केले गेले.

उद्धव ठाकरेंना झोप लागणार नाही– किरीट सोमय्या

पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार आहे. श्रीधर पाटणकर यांच्या बँक खात्यातून पुढे कुणाला पैसे ट्रान्सफर झाले. त्याची माहिती जनतेसमोर आल्यास उद्धव ठाकरेंची झोप उडेल. पुढील काळात सर्व भ्रष्टाचाराचा हिशोब होणार असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपा