मुंबई : क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नवाब मलिक आणि संबंधितांनी बनविला आहे. त्यातूनच दररोज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर खोटे, चुकीचे आरोप केले जात होते. ओढूनताणून दोषी ठरविण्याच्या या प्रयत्नांतूनच आता व्हिडिओ क्लिप आली असावी, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. यासंदर्भात दरेकर म्हणाले की, एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर ट्विट करून त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराचे वागणे चुकीचे आहे. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखविण्यासाठी त्या गोष्टी तयार केल्या जात नाहीत ना, असा संशय येतो, असेही त्यांनी सांगितले.
Praveen Darekar : एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:55 AM