मुंबई - राज्यातील नव्या मंत्र्यांना राज्य शासनाकडून बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नव्या मंत्र्यांना मलबार हिल तसेच मंत्रालय परिसरातील बंगले राहण्यासाठी देण्यात आलेले आहेत. मात्र यामध्ये परिपत्रक काढताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना देण्यात आलेला अ ९ हा बंगला शासनाकडून बदलण्यात आला आहे.
राज्य शासनाने प्रविण दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर शासकीय निवासस्थान म्हणून अ ९ हा बंगला देण्यात आला होता. मात्र आज शासनाने परिपत्रक काढून दरेकरांचा अ ९ बंगला मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे. त्याऐवजी प्रविण दरेकर यांना अवंती ८ हे शासकीय निवासस्थान दिलं आहे. तत्पूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर निवासस्थान देण्यात आलं आहे. मात्र माझा बंगला बदलून दुसरं शासकीय निवासस्थान देण्यात आलं आहे. राज्य सरकारने सुडाच्या भावनेने माझ्यावर अन्याय केला असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये यापूर्वीही मंत्र्यांचे खाते, बंगले अदलाबदली करण्यात आल्याची ताजी उदाहरणं आहेत. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना पेडररोडवरील रॉयलस्टोनऐवजी मलबार हिल येथील नंदनवन बंगला देण्यात आला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मेघदूत बंगला देण्यात आला होता. त्यानंतर आता हा बंगला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना चित्रकुट बंगला शासनाकडून दिला होता मात्र हा बंगला त्यांना पसंत पडला नाही त्यामुळे यांना पर्णकुटी बंगला वितरीत करण्यात आला आहे.
शासनाकडून आज परिपत्रक काढून नव्या ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा, राजेश टोपे यांना जेतवन अशाप्रकारे बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पसंतीचा मलबार हिल येथील देवगिरी बंगला देण्यात आला आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरेंना मंत्रालयासमोरील अ-६ बंगला देण्यात आला आहे.