विरोधी पक्षनेतेपद प्रवीण छेडांकडे
By admin | Published: March 5, 2016 03:30 AM2016-03-05T03:30:50+5:302016-03-05T03:30:50+5:30
पालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय पक्षांमध्ये स्थित्यंतरे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ राष्ट्रवादीच्या पालिकेतील नेतृत्वात बदल होण्याची चर्चा रंगली असताना प्रत्यक्षात
मुंबई : पालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय पक्षांमध्ये स्थित्यंतरे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ राष्ट्रवादीच्या पालिकेतील नेतृत्वात बदल होण्याची चर्चा रंगली असताना प्रत्यक्षात काँग्रेसने आघाडी घेत विरोधी पक्षनेता तडकाफडकी बदलला आहे़ भाजपातून बाहेर पडून गेली पाच वर्षे या पदासाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी करणाऱ्या प्रवीण छेडा यांच्या गळ्यात अखेर विरोधी पक्षनेते पदाची माळ पडणार आहे़
२०१२ च्या पालिका निवडणुकीत भाजपातून तिकीट नाकारल्यामुळे नाराज प्रवीण छेडा काँग्रेसवासी झाले़ राजकारणातील आपल्या प्रदीर्घ अनुभव व संभाषण चातुर्याच्या जोरावर विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांनी पक्षात वजन वापरण्यास पहिल्याच वर्षी सुरुवात केली़ मात्र विरोधी गोटातून आलेल्या छेडा यांना सुरुवातीपासून पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले़
एकीकडे छेडा यांची व्यूहरचना सुरू असताना दुसरीकडे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर घेतलेली पत्रकार परिषद भोवली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे़ गुरुदास कामत यांच्या समर्थक म्हणून ओळखले जाणारे आंबेरकर यांना नारळ देत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी छेडा यांना नेतेपद दिल्याचे पालिकेला कळविले आहे़ (प्रतिनिधी)