शिवस्मारकापर्यंत जाणाऱ्या मेट्रोला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:29 AM2021-02-10T02:29:31+5:302021-02-10T02:29:50+5:30
मच्छीमार कृती समिती आक्रमक
मुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेचा विरोध स्थानिक मच्छीमार करीत आले आहे. मच्छीमारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार सर्व राजकीय पक्ष करीत आले आहेत.
मच्छीमारांची उपजीविका उद्ध्वस्त करण्याचा प्रताप थांबविण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना केले आहे. मेट्रो भुयारी मार्गाने शिवस्मरकाकडे बाराही महिने जाता येईल असे प्रसारमाध्यमांना दिलेल्या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा संस्थेने निषेध केला आहे. सदर प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार उद्ध्वस्त होणार हे निश्चित आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केले आहे.
प्रस्तावित स्मारक बांधणीच्या जागेच्या लागून परिसरात पारंपरिक मच्छीमार बांधव आपली उपजीविका भागवत असतात. सदर जागेत सागरी जैविक विविधता आहे. त्यामुळे सदर जागेचा हट्ट महाविकास आघाडी सरकारने थांबवावे.
महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातील बांद्रा बँडस्टँड येथे केल्यास मच्छीमार समाजाचा विरोध राहणार नाही याची हमी संस्थेने सरकारला दिली आहे.
बँडस्टँड येथे स्मारक झाल्यास कमी खर्चात भव्य स्मारकाची उभारणी होऊन बाराही महिने तमाम जनता स्मारकाला भेट देऊ शकतात तसेच गिरगाव चौपाटी आणि राज भवनाच्या समुद्रात महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारल्यास येथे जेटीच्या मार्गाने गेटवे ऑफ इंडियासारख्या पद्धतीने जनता महाराजांच्या पुतळ्याचे भेट देण्यास बाराही महिने जाऊ शकतात, असे संस्थेचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडी सरकारने महाराजांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे असे तांडेल यांनी सरकारला विनंती केली आहे. मागील युती सरकारने मच्छीमारांवर केलेले अन्याय आता महाविकास आघाडी सरकार सुद्धा करीत आहेत हा आरोप समितीने केला आहे.
प्रस्तावित स्मारक बांधणीच्या जागेच्या लागून परिसरात पारंपरिक मच्छीमार बांधव आपली उपजीविका भागवत असतात. सदर जागेत सागरी जैविक विविधता आहे. त्यामुळे सदर जागेचा हट्ट महाविकास आघाडी सरकारने थांबवावे.