निवडणूक आयोगाविरोधात वंचित आंदोलन छेडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:31 AM2019-06-08T03:31:22+5:302019-06-08T06:13:50+5:30
प्रकाश आंबेडकर; काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडीबाबत चर्चा नाही
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मते यात तफावत आढळून आली आहे. या फरकाबाबत निवडणूक आयोगाने समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे; अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
लोकांमध्ये निवडणुकांबाबत साशंकता आहे. २०१४ च्या निकालानंतर जसा जल्लोष होता तसे यंदा दिसले नाही. राज्यातील ४८ पैकी २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे. तर, उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ ईव्हीएमशी छेडछाड शक्य आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे आकडेवारीतील फरकाबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करावा. शिवाय, या प्रकरणात मोदी आणि शहांनी पडू नये, असा इशाराही आंबेडकरांनी दिला.
निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे आणि ईव्हीएमबाबत राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, असेही ते म्हणाले. देशभरातील ३०० हून अधिक जागांवरील मतांमध्ये तफावत आढळून आल्याने मोदी सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.