तलासरी : मुंबई-बडोदा एक्स्प्रेस हायवेचे काम लवकर सुरू होणार असून त्या महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत तलासरीतील पंचायत समिती सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी तलासरीतील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग ही जनसुनावणी का घेते आहे, असा सवाल करून निषेध करत जनसुनावणीतून सभात्याग केला.या महामार्गाच्या कामासाठी तलासरी पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने जनसुनावणी घेतली. यावेळी पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, प्रदुषण नियंत्रण विभागाचे संजय भोसले, डहाणूच्या प्रांत अधिकारी अंजली भोसले, तलासरीचे तहसिलदार गणेश सांगळे, गटविकास अधिकारी राहुल धूम तसेच प्रकल्पबाधीत आदिवासी शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतलेल्या या जनसुनावणीत तलासरीतील प्रदूषणाबाबत अनभिज्ञ असलेला शेतकरी काय प्रश्न उपस्थित करणार हेच या अधिकाऱ्यांना माहित नव्हते तर या जनसुनावणीचा हेतू काय हा संतप्त सवाल विचारून त्यांनी भंडावून अधिकाऱ्यांना सोडले. त्यामुळे ही जनसुनावणी व्यर्थ आहे असे अधिकाऱ्यांना सुनावत सभात्याग करून त्यांनी निषेध व्यक्त केला. या जनसुनावणीस पालघर येथील प्रकल्प बाधीत शेतकरीही उपस्थित होते. त्यांनी सरकार विविध प्रकल्प आदिवासी भागात आणत आहे. बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे सारखे प्रकल्प आदिवासी भागातून नेऊन आदिवासी शेतकऱ्याला भूमीहिन करण्याचा सरकारचा मानस सरकारचा आहे काय, असा थेट सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.तलासरीत जनसुनावणी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलीच नाही. तसेच नोटीसाही न दिल्याने या जनसुनावणीस शेतकऱ्यांची तसेच ग्रामस्थांची उपस्थिती नगण्य होती. शेतकरी तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मनमानी कारभाराने अधिकाऱ्यांना हा प्रकल्प तडीस नेण्याचा मानस असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.मुंबई बडोदा महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत जे शेतकरी प्रकल्प बाधीत होणार आहे त्यांनाच या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या जनसुनावणीची माहितीच अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बारक्या मांगात यांनी सभागृहात केला. यामुळे या महामार्गाचे भवितव्य तूर्तास तरी संकटात सापडलेले आहे. (वार्ताहर)
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस हायवेला तलासरीत विरोध
By admin | Published: December 02, 2014 11:28 PM