Join us

'काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही'

By महेश गलांडे | Published: January 03, 2021 11:14 AM

राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत

ठळक मुद्दे "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलंय. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या नामांतरणाला काँग्रेसचा विरोधच राहिले, असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं. त्यानंतर, विविध राजकीय पक्षांकडून हा मुद्दा उचलला जात आहे, तसेच, महविकास आघाडीत एकमत नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसच्या विरोधाचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबादच्या नामकरणावरुन आता चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय. 

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितंलय. 

शिवसेना मंत्र्यांकडून संभाजीनगर असा उल्लेख

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.  

यापूर्वीही मनसेच्या राजू पाटील यांनी केलेलं विधान

शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेच आमदार राजू पाटील यांनी म्हटले होते. तसेच, आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही मनसेच्या पाटील यांनी म्हटले होते.   

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेससंजय राऊतमुंबई