Join us  

संख्या घटल्याने विधान परिषदेत विरोधक बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 6:19 AM

विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्या-झाल्या विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार तसेच ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे या सत्ताधारी बाकावर आल्याने विरोधकांचे संख्याबळ कमी झाले.

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना सुरू असताना विधान परिषदेतही विरोधक बॅकफूटवर असल्याचेच चित्र दिसले. उपसभापती मुद्दा, खारघर प्रकरण तसेच शेतकरी आत्महत्या असे विषय जरी विरोधकांकडून उचलले गेले तरी काेणत्याच विषयावर विरोधकांना सभागृह विशेष गाजवता आले नाही.

विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्या-झाल्या विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार तसेच ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे या सत्ताधारी बाकावर आल्याने विरोधकांचे संख्याबळ कमी झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विविध मुद्दे उपस्थित करून शिंदे गटात प्रवेश केलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कायदेशीर उत्तरांपुढे विरोधक निरुत्तर झाले. तालिका उपसभापती यांनी यावर निर्णय देत हा विषयच निकाली काढल्याने उपसभापतिपदावरील आक्षेपच संपुष्टात आला. 

खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार आणि भाई जगताप यांच्यातील शाब्दिक चकमक सोडता सरकारने दिलेल्या उत्तरातील मुद्दा खोडून काढण्यात विरोधकांना अपयश आले. 

दोन आठवडे देखील सुरळीत पार पडणार

 मणिपूर प्रकरणावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न अवघ्या काही मिनिटांतच भाई जगताप यांना आवरता घ्यावा लागला. कांदा अनुदान, शेतकरी प्राेत्साहनपर अनुदान आदी विषयावर सरकारी उत्तरावरच विरोधकांचे समाधान झाले. एकंदर पुढील दोन आठवडेही सुरळीत पार पडणार, हे स्पष्ट झाले आहे.