Join us

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला विरोध, प्राध्यापक संघटना उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:24 AM

नव्याने अंमलात आणलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला वैतागलेल्या प्राध्यापक संघटनांनी आता थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.

मुंबई: नव्याने अंमलात आणलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला वैतागलेल्या प्राध्यापक संघटनांनी आता थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे. कोणत्याही अत्यावश्यक सुविधा न पुरविता सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धतीला संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचे निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबाची कारणमीमांसा ‘द बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन’ने (बीयुसीटीयु) दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. ज्या पद्धतीने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी राबविण्यात आली आहे, त्या पद्धतीलाच संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याचिकेनुसार, प्रतिवादींनी (मुंबई विद्यापीठ आणि अन्य) आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत राबविताना संगणक, इंटरनेट यांसारख्या अत्यावश्यक सुविधाच पुरविल्या नाहीत. त्यामुळे परीक्षांचा निकाल लावताना विलंब झाला.एका दिवसात ३० उत्तरपत्रिका तपासल्या नाहीत तर कारवाई करू, अशी तंबी प्राध्यापक व महाविद्यालयांना दिली आहे. विद्यापीठाने जाणुनबुजून चार दिवस महाविद्यालये बंद ठेवली. जेणेकरून प्राध्यापकांनी १० ते १२ तास काम करावे, असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.