Join us

खासगी वाहकाला ‘बेस्ट’ कामगार संघटनांनी नोंदवला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 7:25 AM

BEST : बेस्ट उपक्रमाचा ताफा सहा हजारांवर नेण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार, सहाशे बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या.

मुंबई : बेस्ट उपक्रमातील ताफा वाढविण्यासाठी ४०० मिडी वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या बसगाड्यांवरील चालकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. मात्र, बसचालकांपाठोपाठ वाहकही कंत्राटी पद्धतीने घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेस, भाजपने विरोध दर्शविला आहे, तसेच हे खासगीकरण हाणून पाडण्याची तयारी कामगार संघटनांनी केल्यामुळे हा प्रस्ताव अडचणीत येण्याची शक्यता आहे.बेस्ट उपक्रमाचा ताफा सहा हजारांवर नेण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार, सहाशे बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. यापैकी प्रत्येक किलोमीटरमागे ८९ रुपये ९० पैसे कमी दराने चारशे मिडी वातानुकूलित बसगाड्यांचा पुरवठा करणाऱ्याची निवड करण्यात आली. या बसगाड्या १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये बेस्ट मोजणार आहे. यात चालक-वाहकही कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असल्याने बेस्ट समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे.त्यानंतर, आता बेस्टमधील कामगार संघटनांनीही प्रशासनाच्या उद्दिष्टांवर संशय व्यक्त केला आहे. बेस्टने ३३३७ स्वतःच्या बसगाड्यांचा ताफा कायम ठेवल्यास, भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्याबाबतचा सामंजस्य करार बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनेत २०१९ मध्ये झाला होता. मात्र, या कराराचा भंग झाल्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, तर आता पुन्हा वाहकदेखील खासगी आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी केला आहे. 

- बेस्ट बसगाड्यांमधून दररोज सुमारे ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. अनलॉकनंतर सध्या २० लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत.- दोन-तीन वर्षांत बसगाड्यांची संख्या सहा हजारांवर नेण्याचे बेस्टचे लक्ष्य आहे.

- बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,६०० बसगाड्या असून, यामध्ये भाडेतत्त्वावरील १,१०० बसगाड्या आहेत. सहाशे नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे.- आतापर्यंत भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाड्यांवर चालक कंत्राटदाराचा, तर वाहक बेस्टचा होता. मात्र, नव्याने येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसवर वाहकाबरोबरच चालकही कंत्राटदाराचा असेल.

टॅग्स :बेस्ट