पवई तलावात मासेमारीला विरोध केल्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:20 AM2018-04-15T04:20:15+5:302018-04-15T04:20:15+5:30
पवई तलावात मासेमारी करण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र स्टेट अँग्लिन असोसिएशनच्या सुरक्षा पर्यवेक्षकासह सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : पवई तलावात मासेमारी करण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र स्टेट अँग्लिन असोसिएशनच्या सुरक्षा पर्यवेक्षकासह सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवप्रकाश रामसेवक यादव (३५) हे गेल्या दोन दिवसांपासून पवई तलावाच्या महाराष्ट्र स्टेट अँग्लिन असोसिएशन येथे सुरक्षा पर्यवेक्षक पदावर रूजू झाले आहेत. पवई तलावात कोणीही मासेमारी करू नये, याची जबाबदारी त्यांच्यावर असते. गुरुवारी दुपारी १च्या सुमारास सुरक्षारक्षक भरत गुप्ताकडून समजले की, तलावात मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आले आहे. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील ६ जाळी हटविली.
सायंकाळी पाचच्या सुमारास ओळखीच्या तरुणाने त्यांना भेटण्यासाठी बोलावले. पवईतल्या आंबेडकर उद्यानाकडे त्यांनी भेट घेतली. तेव्हा तेथे आणखीन ४ जण आले, त्यांनी त्यांना महाराष्ट्र स्टेट अँग्लिन असोसिएशन (क्लब)चे कंत्राट घेतले का, याबाबत विचारणा केली. त्यांनी होकार देताच, ‘यहॉ पे जो कॉन्ट्रॅक्ट लेता है, तो आधा हिस्सा हमे देते है, तुमको भी आधा हिस्सा देना पडेगा, नही तो बोट पलटी करेंगे, और लढाई झगडा होगा तो आपकी जिम्मेदारी है’ अशी धमकी दिली. त्यावर १४ एप्रिलनंतर मीटिंग करू, असे सांगून ते निघून गेले.
त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास गुप्ता हा तलावाची देखरेख करत
होता. त्याच दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास ६ ते ७ जण तोंडाला
रुमाल बांधून त्याच्याकडे आले आणि त्याला बेदम मारहाण सुरू केली. ही बाब यादवला समजताच त्यानेही तेथे धाव घेतली. जाळे का हटविले, असे म्हणत त्यालाही मारहाण करत निघून गेले. त्यानंतर अन्य साथीदारांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी यादव यांच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकारामुळे पवई तलावातील मत्ससुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.