लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राणा कपूरची पत्नी आणि मुलींच्या जामीन अर्जाला सीबीआयने उच्च न्यायालयात विरोध केला. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्याने तिघींनीही उच्च न्यायालयात धाव घेतली.
राणा कपूर याची पत्नी बिंदू व मुली रोशनी व राधा कपूर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे बुधवारी झाली. विशेष न्यायालयाने १८ सप्टेंबर रोजी बिंदू, रोशनी व राधा कपूर यांचा जामीन अर्ज फेटाळला. डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या तिघीही आरोपी आहेत. सुरुवातीला तपास यंत्रणेने या तिघींनाही अटक केली नाही. न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. गेल्या वर्षी ८ मार्च रोजी राणा कपूर याला ईडीने अटक केली. त्यानेही न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारून चूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे तिघींनी जामीन अर्जात म्हटले आहे.
ईडीतर्फे ॲड. हितेन वेणेगावकर यांनी विशेष न्यायालयाने या तिघींचा अर्ज फेटाळून योग्य कारवाई केल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. या तिघी खटल्यासाठी न्यायालयात उपस्थित राहाव्यात, यासाठी न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकांवर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे.
तर राणा कपूरची तिसरी मुलगी राखी कपूर- टंडन हिने विशेष न्यायालयात अनुपस्थित राहण्यासाठी याचिका केली आहे. कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध आल्याने आपण भारतात येऊ शकत नाही. आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात उपस्थित राहू, असे राखी कपूर हिने याचिकेत म्हटले आहे. तर राणा कपूरनेही विशेष न्यायालयाने १४ दिवस सीबीआय कोठडी सुनावल्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.