Join us

औरंगाबादचे नामांतर करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:07 AM

औरंगाबादचे नामांतर करण्यास विरोधमराठा क्रांती मोर्चाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेसने वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधात ...

औरंगाबादचे नामांतर करण्यास विरोध

मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेसने वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आरक्षण देण्याचा मुद्दा असो किंवा औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे असो, या सर्व मुद्द्यांवर काँग्रेसने मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शनिवारपासून काँग्रेस विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चेचे बाळासाहेब शिंदे, मयूर धुमाळ, गणेश माने, गौरव पवार, सत्यवान गायकवाड, अमोल फडतरे उपस्थित होते. अंकुश कदम म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास विरोध केला आहे. क्रूर औरंगजेबाने आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली आहे. त्याचे नाव बदलण्याची मागणी गेले ३० वर्षे केली जात आहे. शिवप्रेमींनीही तीच मागणी केली. मात्र, काँग्रेसचे मूळ हे मुस्लीम असल्याने त्यांना खूश करण्यासाठी थोरात प्रयत्न करत आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असून, याला सर्वस्वी अशोक चव्हाणच जबाबदार आहेत. आरक्षणाबाबत तज्ज्ञांबरोबर चर्चा करा, असे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. आरक्षणाच्या प्रत्येक बैठकीला वेगवेगळ्या लोकांना बोलावून समाजात संभ्रम निर्माण केला. मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आर्थिक मागास वर्गामधून आरक्षण लागू करणार नाही, असे सांगूनही आर्थिक मागास वर्गामधून आरक्षण लागू केले, असे कदम म्हणाले

मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, अशी मागणी या आधी केली जात होती. मराठा समाजाला मागास वर्ग आयोगाने मागास वर्ग मानले असून, त्यामुळे आरक्षण मिळाले आहे. हे आरक्षण विधिमंडळ आणि उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र, आघाडी सरकारने हे आरक्षण हिरावून घेतले. मराठा समाजाचे नेते संभाजी महाराज मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले असता, आर्थिक मागास वर्गामधून आरक्षण देणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांत आर्थिक मागास वर्ग प्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला, तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, यासाठी येत्या चार ते पाच दिवसांत राज्यस्तरीय बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

......................