प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:39 IST2025-04-16T12:38:34+5:302025-04-16T12:39:37+5:30

शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने आंदोलन केले. प्रभादेवी पूल पाडल्यावर पूर्व-पश्चिम भागाचा संपर्क तुटणार आहे.

Opposition to demolition of Prabhadevi bridge, Uddhav Sena launched a signature campaign while MNS protested | प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन

प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन

मुंबई : वरळी शिवडी उन्नत मार्तासाठी प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम करून येथे नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र, पुलाच्या पाडकामास विरोध करत उद्धवसेनेने सह्यांची मोहीम राबविली तर मनसेने धरणे आंदोलन केले. पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही, असा इशारा दोन्ही पक्षांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांना दिला.

शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने आंदोलन केले. प्रभादेवी पूल पाडल्यावर पूर्व-पश्चिम भागाचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका आणि गाड्यांना येण्यासाठी पर्याय उपलब्ध करावा. तसेच या कामामुळे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ता राहणार नाही, असे आ. चौधरी यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला. प्रभादेवी स्थानकातील दक्षिणेकडील पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करायला हवे. रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिक, परळ येथील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काम पूर्ण केले पाहिजे. -अरविंद सावंत, खासदार नेते, उद्धवसेना

पहिले पुनर्वसन करा; मगच पूल पाडा

नवीन द्विस्तरीय पुलाच्या खांबामुळे लक्ष्मी, हाजी नुरानी इमारती बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही तरीही पूल पाडण्याची घाई एमएमआरडीए का करत आहे, असा सवाल करत शाखाध्यक्ष मंगेश कसालकर यांच्या अध्यक्षतेखाली मनसेने धरणे आंदोलन केले.

एल्फिस्टन उड्डाणपूल बंद करू नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी हरकती मागविल्या. त्यावर हजारो स्थानिकांनी हरकती पाठवल्या. त्याचे निरसन होण्याआधीच एमएमआरडीएने लोकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे बोर्ड लावले. हा यंत्रणेचा दुटप्पीपणा आहे. -यशवंत किल्लेदार, मुंबई शहर उपाध्यक्ष, मनसे

Web Title: Opposition to demolition of Prabhadevi bridge, Uddhav Sena launched a signature campaign while MNS protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.