नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपआपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनडीएची नवी दिल्लीत मंगळवारी बैठक होत असून, जवळपास ३० पक्ष या आघाडीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर बंगळुरूत आज आणि उद्या २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. या बैठकीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण पहिल्या आणि दुसऱ्या सभेच्या या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे.
या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीही उपस्थित राहू शकतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बंगालच्या ममता बॅनर्जी, बिहारचे नितीश कुमार, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, दिल्लीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सपा प्रमुख अखिलेश यादव हेही या बैठकीत असतील.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १७ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत आयोजित केलेल्या रात्रीच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नाहीत. गुडघ्याच्या नुकत्याच झालेल्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. टीएमसीच्या वतीने अभिषेक बॅनर्जी डिनरला उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, शरद पवार १७ जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत, त्यामुळे ते देखील बंगळुरूतील बैठकीत रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहणार नाहीत.
दरम्यान, एनडीएची बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सहकारी पक्षांशिवाय भाजपने नवीन मित्रपक्षांना आणि माजी सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे. दिल्लीत अशोक हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. बिहारमधील चार प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र सिंह कुशवाह आणि विकासशील इंसान पक्षाचे मुकेश सहानी यांचा त्यात समावेश आहे.
एनडीएमध्ये सध्या कोण?
एनडीएमध्ये सध्या २४ पक्ष आहेत. यात भाजप, अण्णाद्रमुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, नॅशनल पीपल्स पार्टी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आयएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिझो नॅशनल फ्रंट, टीएमसी, आयपीएफटी (त्रिपुरा), बोडो पीपल्स पार्टी, पीएमके, एमजीपी, अपना दल, आसाम गण परिषद, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल संयुक्त (ढींढसा) आणि जनसेना (पवन कल्याण) यांचा समावेश आहे.