जोगस पार्क जवळील "पे अँण्ड पार्क" ला विरोध
By जयंत होवाळ | Published: July 30, 2024 05:06 PM2024-07-30T17:06:23+5:302024-07-30T17:07:14+5:30
Mumbai News: कार्टर रोड येथे असणाऱ्या प्रसिद्ध जोगस पार्क येथे प्रस्तावित "पे अँण्ड पार्क" ला विरोध करीत आज स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
- जयंत होवाळ
मुंबई - कार्टर रोड येथे असणाऱ्या प्रसिद्ध जोगस पार्क येथे प्रस्तावित "पे अँण्ड पार्क" ला विरोध करीत आज स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
वांंद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कार्ट रोड परिसरात समुद्र किनारी अत्यंत सुबक असे प्रसिद्ध "जोगस पार्क" असून या परिसराचे हे खास आकर्षण ठरावे असे हे उद्यान आहे. या गार्डन समोर पार्किंगची मोकळी जागा असून आतापर्यंत मोफत पार्किंग उपलब्ध होते. मात्र यापुढे त्या जागेवर शुल्क आकारुन पार्किंगची सुविधा देण्याबाबत पालिका विचार करीत आहे. त्याला विरोध करण्यात आला आहे.
वांद्रे, खार, सांताक्रूझ या परिसरातील बहूसंख्य नागरिक या गार्डनमध्ये सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी येतात. त्यांची संख्या मोठी असून त्यांना पार्किंगचा भुर्दंड पालिकेने लादू नये अशी भूमिका स्थानिक आमदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अँड आशिष शेलार यांनी घेतली आहे. याबाबत पालिका आयुक्तांना लवकरच निवेदन देण्यात येणार असून या निवेदनात स्थानिकांचा असलेला विरोध प्रतिबिंबित व्हावा म्हणून वांद्रे पश्चिम विधानसभा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून आज सकाळी 6.30 वाजल्यापासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. भाजपा विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत,
स्थानिक नगरसेवका स्वप्ना म्हात्रे आणि पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुमारे 250 हून अधिकांनी स्वाक्षरी करुन आपला विरोध अधोरेखित केला, अशी माहिती स्वप्ना म्हात्रे यांनी दिली.