सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:42 PM2022-04-19T12:42:17+5:302022-04-19T12:44:11+5:30
सानपाड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने विरोध केला आहे.
मुंबई – राज्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर जशास तसं उत्तर देऊ असंही आव्हान त्यांनी दिले आहे. त्यानंतर राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी नेत्यांकडून केला जात आहे.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आता विविध संघटना त्यांच्या पाठिशी येत असल्याचंही दिसून येत आहे. सानपाड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने मशिदीला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मनसेने आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यानंतर नवी मुंबई सानपाडा मशिदीसाठी सिडकोकडून देण्यात आलेला भूखंड रद्द करावा, सानपाडावासियांच्या न्यायालयीन लढ्याला मनसेचा पूर्ण पाठिंबा तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. ५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाणार आहे. त्याची जबाबदारी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी १० ते १२ ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. याशिवाय राज यांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिण्यात आले आहे.
'निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवल्या'
संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना सांगितले की, "दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलणे हा भाजपाच्या योजनेचा भाग आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलींचे वातावरण तयार केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला.