Join us

प्रजासत्ताक दिनी भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’, दिग्गज नेत्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 1:36 PM

मुंबईमध्ये विरोधीपक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीला काढली. 

मुंबई- मुंबईमध्ये विरोधीपक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीला काढली.  या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. आंबेडकर पुतळा ते  गेट वे ऑफ इंडिया अशी ही रॅली आहे. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरूवात झाली असून रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाहीये. कोणतीही घोषणाबाजी न करता विरोधकांची मूक रॅली सुरू आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,  खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला,  सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले. दरम्यान, संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळते आहे. परवानगीशिवाय रॅली काढल्याने कारवाई केली जाणार असून मुंबई पोलीस आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं समजतं आहे. 

देशातील राज्यघटना बदलण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे विधान आणि गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव रॅलीचे आयोजन केलं.  ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या पदयात्रेचे संयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

 

दरम्यान, संविधान बचाव रॅली अराजकीय आहे. या रॅलीत कोणताच नेता भाषण करणार नाही, कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरणार नाही. संविधानाबाबत बांधिलकी असणारे नेते यात सहभागी होतील, असं गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटलं होतं.