मुंबई : महापारेषणच्या वीज वाहिन्यांवरून ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्यासह उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यावसायिक वापर करण्याचे बिझनेस मॉडेल तयार करा, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. एमएसईबी होल्डिंग कंपनी सभागृहात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.बिझनेस मॉडेलमुळे ट्रान्समिशनमध्ये आमूलाग्र सुधारणा होऊन वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच कम्युनिकेशन क्षेत्रासाठी ही व्यवस्था फायदेशीर ठरून ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. राज्यात महापारेषणचे ४५ हजार किलोमीटर लांबीचे वाहिन्यांचे जाळे आहे. राज्यात ८६ हजार मनोरे असून त्यावर मोबाइल सेवेसाठी अँटेना उभारणे शक्य आहे. तसा प्रयोगही दोन ठिकाणी करण्यात आला आहे. या वाहिन्यांवरून विजेच्या तारेखाली ऑप्टिकल फायबर केबल टाकून सर्व सबस्टेशन जोडता येतील. त्याचा फायदा पारेषणच्या संदेशवहन यंत्रणेत गतिमानता आणि आधुनिकता येऊन देखभाल दुरुस्ती तसेच कोठे बिघाड असल्यास तत्काळ त्यावर काम करणे सोपे होईल. मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणामुळे तर याची गरज लक्षात आली आहे. काम सुरू करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
मनोऱ्यांवरून ऑप्टिकल फायबर; जलद इंटरनेट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 2:56 AM