महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन ऑप्टिकल फायबर; जलद इंटरनेट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 05:56 PM2020-10-28T17:56:25+5:302020-10-28T17:56:57+5:30
Fast Internet : बिझनेस मॉडेल तयार करा
मुंबई : महापारेषणच्या वीज वाहिन्यांवरुन ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्यासह उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यवसायिक वापर करण्याचे बिझनेस मॉडेल तयार करा, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. एमएसईबी होल्डींग कंपनी सभागृहात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. बिझनेस मॉडेलमुळे ट्रान्समिशनमध्ये अमूलाग्र सुधारणा होऊन वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच कम्युनिकेशन क्षेत्रासाठी ही व्यवस्था फायदेशीर ठरुन ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
राज्यात महापारेषणचे ४५ हजार किलो मीटर लांबीचे वाहिन्यांचे जाळे आहे. राज्यात ८६ हजार मनोरे असून त्यावर मोबाईल सेवेसाठी अँटेना उभारणे शक्य आहे. तसा प्रयोगही दोन ठिकाणी करण्यात आला आहे. या वाहिन्यांवरुन विजेच्या तारेखाली ऑप्टिकल फायबर केबल टाकून सर्व सबस्टेशन जोडता येतील. त्याचा फायदा पारेषणच्या संदेशवहन यंत्रणेत गतीमानता आणि आधुनिकता येऊन देखभाल दुरुस्ती तसेच कोठे बिघाड असल्यास तात्काळ त्यावर काम करणे सोपे होईल. मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणामुळे तर याची गरज लक्षात आली आहे. त्यावर तात्काळ काम सुरू करावे, अशा सुचना राऊत यांनी दिल्या.