Join us

अकरावीसाठी ऐच्छिक सीईटी, मूल्यमापनाचा घोळ घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

विद्यार्थ्यांची मागणी; दुहेरी निकषांमुळे घोळ कायमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरवताना अंतर्गत मूल्यमापनाचा आधार, ...

विद्यार्थ्यांची मागणी; दुहेरी निकषांमुळे घोळ कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरवताना अंतर्गत मूल्यमापनाचा आधार, त्याला नववीच्या निकालाची दिलेली जोड यामुळे सं‌भ्रम कायम असतानाच अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी ऐच्छिक ठेवल्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीईटीत चांगले गुण मिळवणारे आणि ती प्रवेश परीक्षा न देणारे यांचा सारखाच विचार होणार असल्याने या ऐच्छिक परीक्षेला काय अर्थ उरला, असा मुद्दा मांडत शिक्षण विभागाने निर्णय घेताना घोळाची परंपरा कायम ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लावायचा आहे. शिवाय ज्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने समाधान होणार नाही, त्यांच्यासाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेचाही पर्याय आहे. मात्र, कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर ही परीक्षा होणार असल्याने तोवर अकरावीचे प्रवेश पूर्ण झालेले असतील. मग सुधारित गुणांच्या आधारे शाखा बदलता येईल का, तो पर्याय ठेवला तर अकरावीचं वर्ष वेळेत सुरू होईल का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत.

अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का ठेवली, ती सक्तीची का नाही किंवा रद्दच का केली नाही, यातून फक्त संभ्रम वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी संदर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा, असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात ९० टक्क्यांहून अधिक गुण असतील मात्र काही कारणास्तव ते सीईटी देऊ शकले नाहीत तर ते त्यांचे नुकसान असेल, असे मत नवी मुंबईतील नूतन मराठी विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी विवेक खुळे याने व्यक्त केले.

आमचा नववीचा निकाल चांगला लागला आहे. त्यावरून आमचे मूल्यमापन होणे योग्यच आहे, मात्र अचानक एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणाऱ्या सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास त्याला जबाबदार कोण? अद्याप सीईटीचे प्रारूप, आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना ती कशी देणार? असा प्रश्न नेरूळमधील दहावीची विद्यार्थिनी सिद्धी चौधरी हिने उपस्थित केला. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती, तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना, त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना समानता कशी आणणार, असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

प्रचलित पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा या परिस्थिती निवळल्यानंतर कधी होतील, याचा नेम नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर अकरावी प्रवेशासाठी आम्हाला परवानगी द्यावी. सीईटी परीक्षेची आमची अद्याप तयारी नाही, शिवाय ताेपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येणार की नाही, त्याबद्दलही सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया पांचोलिया हायस्कूलमधील दहावीची विद्यार्थीनी प्रियांका कळंबे हिने दिली आहे.

स्वरूप लवकर समजणे गजरेचे

शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या गुणांवर माझा विश्वास आहे. मात्र, अकरावीत लवकर प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असेल तर किमान तिचे वेळापत्रक आणि कोणत्या विषयाला किती गुणांचे किती प्रश्न असतील, याचे स्वरूप लवकर समजायला हवे. ही प्रवेश परीक्षा सुरक्षित व्हावी.

- धनश्री कुलकर्णी, दहावी, नूतन मराठी हायस्कूल