...अन् सुट्टी बेतली लहानग्यांच्या जिवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:23 AM2019-07-18T05:23:06+5:302019-07-18T05:23:17+5:30
रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांच्या कानावर पडल्या आणि काही वेळात पहाटे साडेपाचच्या सुमारास हमीलाबानो मोहम्मद रशीद इद्रिसी या महिलेला त्यांनी सुखरूप बाहेर काढले.
मुंबई : ‘मला बाहेर काढा..’, ‘मला वाचवा’ अशा आर्त हाका मंगळवारी रात्री रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांच्या कानावर पडल्या आणि काही वेळात पहाटे साडेपाचच्या सुमारास हमीलाबानो मोहम्मद रशीद इद्रिसी या महिलेला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आईच्या शेजारी असलेल्या लहानग्यांना मृत्यूने मिठी मारली होती. सुट्टी असल्याने मुंबईत फिरायला आलेल्या या लहानग्यांचा करुण अंत झाला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून हमीलाबानो यांचे पती रशीद इद्रिसी डोंगरीच्या चाळीत राहतात. मूळचे लखनऊचे असलेले रशीद डोंगरी परिसरातील लेडीज गारमेंटच्या कारखान्यात कामगार आहेत. त्यांच्या गावातील अनेक तरुणही याच कारखान्यात काम करतात. मात्र या सर्वांची कुटुंबे लखनऊमध्ये असतात.
शाळेला सुटी असल्याने रशीदची पत्नी व दोन लहान मुले मुंबईत आली होती. रशीदचा भाऊ सबीर मोहम्मद यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच डोंगरीमध्ये दाखल झालो. वहिनी व लहानग्यांचा शोध सुरू होता. बराच वेळ ती सापडत नसल्याने सर्वांच्या मनात धाकधूक होती. भीती आणि चिंतेने टोक गाठले होते. अखेर, बुधवारी पहाटेच्या सुमारास वहिनी सापडली. थोड्या वेळात मुलंही... पण माझे भाचे निपचित पडले होते. त्यांना पाहून कोसळून गेलो. त्यांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. त्यांच्या आईला याची कल्पना नाही, तिला बाहेर काढले तेव्हा जिवाच्या आकांताने ती लहानग्यांविषयी विचारत होती. तिला उपचारांकरिता त्वरित जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. अरबाज मोहम्मद रशीद इद्रिसी (७) आणि शहजाद मोहम्मद रशीद इद्रिसी (८) अशी मरण पावलेल्या लहानग्यांची नावे आहेत. आता या दोघांच्या पार्थिवावर लखनऊला गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
>पुन्हा घर कोण देणार?
रशीद अनेक वर्षे कारखान्यात काम करतोय, कुटुंबापासाठी पै - पै एकत्र करून पत्नी, मुलांना मुंबईला घेऊन यायचे त्याचे स्वप्न होते. मुंबईत लहानसे घर घेऊन खूप कष्ट करून मुलांना मोठे करायचे होते. पण या दुर्घटनेने रशीदची मुले कायमची त्याच्यापासून दुरावली. पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. या सगळ्यामुळे रशीद खचून गेलाय. त्याने या घटनेचा मानसिक धक्का घेतलाय. आता त्याला घर कोण देणार? त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन कोण करणार? हा प्रश्न आहे.
- झुबैद, रशीदचा मित्र.