Join us  

तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा उशिराने सुरू

By admin | Published: February 23, 2017 6:47 AM

मतदानाचा दिवस शांततेत पार पडल्याने, बुधवारी उमेदवार, निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी

मुंबई : मतदानाचा दिवस शांततेत पार पडल्याने, बुधवारी उमेदवार, निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला, पण सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र, अभ्यासाला सुरुवात करण्याआधी शाळेची स्वच्छता करावी लागली. मतदान झाल्यानंतर बाक न लावता, कचरा इतरत्र टाकून निवडणूक अधिकारी, कर्मचारी निघून गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता करून, मग अभ्यासाला सुरुवात केली. परिणामी, फातिमा देवी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा उशिरा सुरू झाल्या. मतदानासाठी महापालिका शाळांसह खासगी शाळा आणि महाविद्यालये घेतली जातात. मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या वर्गांमधील बाकांची रचना बदलली जाते, पोस्टर लावली जातात. मतदान केंद्र असणाऱ्या वर्गांची रचना पुन्हा पहिल्यासारखी करून देण्यासाठी कंत्राट दिले जाते, पण महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र असलेल्या मालाड येथील फातिमादेवी इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विक्रोळीतील कन्नमवारनगर १ माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षकांना वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या शाळांमध्ये कागदाचे तुकडे, पाण्याच्या बाटल्या तशाच टाकलेल्या होत्या. त्याचबरोबर, वर्गातील बाक बाहेर तसेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा वेळ हा स्वच्छता व वर्गांची रचना करण्यात गेल्याचे फातिमा देवी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे राजेश पंड्या यांनी सांगितले. मतदान केंद्र असल्यामुळे काल शाळेला सुट्टी होती, पण बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याने, सर्व जण सकाळी नेहमीच्या वेळी शाळेत आले. आज दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा होत्या, पण शाळेची अवस्था पाहिल्यावर अनेक जण अवाक् झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देण्यासाठी त्यांच्याकडून शाळेची स्वच्छता करून घेण्यात आली. शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आल्याने, आता त्यांना सकाळी लवकर येणे शक्य नव्हते. आयोगातर्फे शाळेची मांडणी व स्वच्छता करण्यासाठी कंत्राट दिले जाते. त्यांच्याकडे व्यक्ती नसल्यास त्यांनी शाळांना सांगितले पाहिजे. शाळेत होणाऱ्या अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही शाळांना सुट्टी जाहीर करावी, असे मत पंड्या यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)