तोंडावाटे थायरॉईडची शस्त्रक्रिया

By Admin | Published: October 15, 2016 07:11 AM2016-10-15T07:11:38+5:302016-10-15T07:14:36+5:30

थायरॉईडच्या शस्त्रक्रियेनंतर गळ्यावर व्रण राहतात. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. पण, केईएम रुग्णालयात एका २६ वर्षीय महिलेवर

Oral thyroid surgery | तोंडावाटे थायरॉईडची शस्त्रक्रिया

तोंडावाटे थायरॉईडची शस्त्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : थायरॉईडच्या शस्त्रक्रियेनंतर गळ्यावर व्रण राहतात. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. पण, केईएम रुग्णालयात एका २६ वर्षीय महिलेवर तोंडावाटे थायरॉईडची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तिच्या गळ्यावर कोणताही व्रण नाही आणि अवघ्या एका दिवसात तिला घरी जाण्याचीही परवानगी मिळाली. उल्लेखनीय म्हणजे तोंडावाटे थायरॉईडची शस्त्रक्रिया करण्याची महापालिका रुग्णालयातील ही पहिलीच वेळ आहे.
मुंबईत राहणाऱ्या या २६ वर्षीय महिलेचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले. तीन महिन्यांपूर्वी तिला ‘हायपर फंक्शनिंग थायरॉईड’ असल्याचे निदान झाले. हायपर थायरॉईड असल्याने तत्काळ तिच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे ती केईएम रुग्णालयात उपचारांसाठी आली. तीन महिन्यांपूर्वी औषधोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सर्जरी विभागातील डॉ. समीर रेगे यांनी
दिली.
डॉ. रेगे यांनी सांगितले की, तीन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे तिचे थायरॉईड ‘स्टेबल’ करण्यात आले. श्वास नलिकेच्या वर थायरॉईड असते. पेशींना चिकटून असल्याने शस्त्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी लागते. मानेवाटे शस्त्रक्रिया केल्यावर त्याचे व्रण राहतात. काही प्रमाणात रक्तस्रावही होतो. त्यामुळे रुग्णाला त्रास होतो. या महिलेचे काही दिवसांपूर्वीच लग्न झालेले असल्यामुळे गळ्यावर व्रण दिसायला नकोत म्हणून तोंडावाटे ही शस्त्रक्रिया करण्याचे आम्ही ठरवले. बुधवारी केईएम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. आर.डी. पाटील आणि डॉ. श्रीनिवास यांच्या मदतीने एका तासात शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सायंकाळी या महिलेने पाणी प्यायले. त्यानंतर गुरुवारी तिला लिक्विड डाएट देण्यात आले. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळे तिला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. पण, महापालिका रुग्णालयात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमध्ये रक्तस्राव झाला नाही. त्यामुळे तिच्या घशाला जास्त त्रास झाला नसल्याने लगेच दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला, असेही डॉ. रेगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Oral thyroid surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.