मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सोमवारी मुंबईसह संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.
११ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १२ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १३ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. १४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असतानाच शनिवारी सकाळी मुंबईत आकाश स्वच्छ होते. दुपारी तर रखरखीत ऊनं पडले होते. मात्र दुपारी दोन ते तीननंतर मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणावर पावसाचे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. मुंबईत चार वाजण्याच्या सुमारास बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागण्यास सुरुवात झाली. मुंबई पावसाची तुरळक हजेरी लागत असतानाच लगतच्या प्रदेशात मोठया प्रमाणावर ढगांचा गडगडाट सुरु झाला. शिवाय मुसळधार पावसाची हजेरी देखील लागली होती.