ऑरेज अर्लट : मुंबईसह ठाण्याला अति मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:50 IST2020-08-21T17:47:53+5:302020-08-21T17:50:07+5:30
मुसळधार ते अति मुसळधार सरी कोसळतील.

ऑरेज अर्लट : मुंबईसह ठाण्याला अति मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मुंबईसह लगतच्या जिल्हयांना पावसाने शुक्रवारी झोडपून काढले असतानाच आता शनिवारी देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्हयांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या इशा-यानुसार या जिल्हयांत पावसाच्या मुसळधार ते अति मुसळधार सरी कोसळतील. परिणामी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचनादेखील देण्यात आल्या आहेत.
मुंबई शहरासह उपनगरात शुक्रवारी मुसळधार सरींनी हजेरी लावली असतानाच आता शनिवारीदेखील अति मुसळधार सरी कोसळणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबईत पावसाने चांगला जोर पकडला होता. दुपारी काही पावसाने विश्रांती घेतली होती. सायंकाळी ५ वाजता पुन्हा उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या होत्या. सायंकाळी ६ च्या आसपास पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. मात्र तरिही अधून मधून काळोख दाटून येत असतानाच कोसळणा-या मोठया सरी मुंबईकरांना धडकी भरवत होत्या.
शनिवारी देण्यात आलेल्या इशा-यानुसार पाऊस कोसळला तर सखल भागात पाणी साचून पुरसदृश्य स्थिती निर्माण होईल. रस्ते वाहतूक विस्कळीत होईल. दरडीचा भाग कोसळेल. पिकांचे नुकसान होईल. नद्यांना पूर येईल. परिणामी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पूर्व मध्य प्रदेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून संपुर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर येत्या २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग