मुंबई - जून महिन्यात काहीशी ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी आणि बुधवारी संपुर्ण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे जोरदार पाऊस पडेल.
बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हयांत जोरदार पाऊस पडेल.
गुरुवारी संपुर्ण कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.