Join us

पावसाचा जोर वाढणार, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळधार; कोकणात ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 3:28 PM

पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; पावसाचा जोर वाढणार

मान्सूनचा परतीचा प्रवास विलंबाने सुरु होणार

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण होणा-या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असून, १२ सप्टेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच काळात म्हणजे शनिवारी संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मे महिन्याच्या तिस-या आठवड्यात सुरु होणारा मान्सूनचा परतीचा प्रवास आणखी लांबणार आहे.

बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश, ओरिसालगत निर्माण होणा-या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १३ सप्टेंबरच्या आसपास विदर्भासह लगतच्या प्रदेशात चांगला पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या काळात मान्सून सक्रीय राहील. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस होईल. कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणा-या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास विलंबाने होईल, असा अंदाज वर्तविल जात आहे. १५ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानमधून आपला परतीचा प्रवास सुरु करतो. मात्र यावेळी त्यास १५ दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचा विचार करता येथे गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. आर्द्रतेमधील चढउतार आणि कमाल तापनात होणारी किंचित वाढ या घटकांमुळे मुंबईचे वातावरण काहीसे तापदायक होत आहे. ऊनं, ऊकाडा आणि अधून मधून बरसणारा पाऊस अशा तिहेरी वातावरणामुळे मुंबई काहीशी त्रासल्याचे चित्र आहे.

टॅग्स :पाऊसमानसून स्पेशलमुंबई मान्सून अपडेटहवामानमहाराष्ट्र