ऑरेंज अर्लट : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:10 PM2020-07-15T19:10:16+5:302020-07-15T19:11:01+5:30
ऑरेंज अर्लट : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड
मुंबई : मुंबापुरीला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच आता गुरुवारी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. गुरुवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, यासोबतच ठाणे, रायगड आणि पालघरलादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ब-याच ठिकाणी पावसाची नोंद झाली.
१६ जुलै कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी सोसाटयाचा वारा वाहील. १७ जुल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १८ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १९ जुलै रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल.
१६ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. १७ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामन्यात: ढगाळ राहील. मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.