Mumbai Rain Updates: मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट; पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे, पालिकेने केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:57 PM2022-07-07T19:57:01+5:302022-07-07T20:00:01+5:30
मुंबईत आज काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असून मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशात पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे असणार आहे. त्यामुळे कामावर निघण्याआधी महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात १५ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
7 July: सक्रिय मान्सून राज्यात ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
- IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचपार्श्वभूमीवर प्रशासनाकडून एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर समुद्रकिनारी कुणीही फिरकु नये अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे. या संबंधित मुंबई महापालिका प्रशासनाने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा तसेच त्याजवळील छत्तीसगडमध्ये तयार झालेल्या चक्रावातामुळे तसेच अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे राज्यात सक्रिय असून, सर्वदूर चांगला पाऊस होत आहे. परिणामी येत्या दोन दिवसांत कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, तर मध्यम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.