ऑरेंज अलर्ट : कोकणात कोसळधारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:17 PM2020-08-28T14:17:29+5:302020-08-28T14:17:57+5:30
पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला.
मुंबई : शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे मुंबईकरांना मोकळीक मिळाली होती. मात्र आता पुन्हा पाऊस लागून राहिल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी पावसाने जोर कायम ठेवला असतानाच शनिवारीदेखील संपुर्ण कोकणात (ऑरेंज अलर्ट) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता मुंबईत ६ मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली. सकाळी पाऊस कमी होता. मात्र दुपारी बारानंतर पावसाने ब-यापैकी वेग पकडला. त्यानंतर लागून राहिलेल्या पावसाने आपला मारा कायम ठेवला होता. पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी घरांचा भाग पडला. ४ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.
२९ ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. ३० ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील. मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.