मुंबई : मुंबई शहर, उपनगरात पाऊस विश्रांतीवर आहे. मात्र, आता भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत आॅरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिला आहे. त्यानुसार, ३ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळतील. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४, ५ आणि ६ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडसह लगतच्या जिल्ह्यांत तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत संपूर्ण दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. कुठे तरी आलेली तुरळक सर वगळता मुंबईकरांचा रविवार कोरडा गेला.