मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज, तर रायगड, रत्नागिरीला आज रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:31 AM2020-07-15T03:31:02+5:302020-07-15T06:11:48+5:30
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरातही बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबई शहर, उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. बुधवारी देखील पावसाचा जोर कायम राहणार असून, या दिवशी मुंबई, ठाणे, पालघरला आॅरेंज, तर रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरातही बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
भांडुपमध्ये एक इसम बुडाला
- मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, वडाळा, दादर टी.टी, धारावी, सायन, नेहरूनगर, बंटर भवन, चेंबूर, अंधेरी सब वे येथील सखल भागात पाणी साचले होते.
- या काळात हिंदमाता ते शिवडीकडे जाणारी वाहतूक भोईवाडामार्गे व रोड नंबर २४ ची वाहतूक रोड नंबर ३ मार्गे वळविण्यात आली होती. २ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ८ ठिकाणी झाडे पडली. ४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
- सायंकाळी ५ वाजता भांडुप येथील कुंडेश्वर तलावात एक इसम बुडाला. त्याचा शोध घेण्याकरिता अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली असून अद्याप शोध सुरू आहे.
मराठवाड्यातही जोरदार
बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. गुरुवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिह्यांत जोरदार पाऊस पडेल. संपूर्ण कोकणातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ,
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग